चेन्नई- पाकिस्तान बालाकोटमध्ये पुन्हा सक्रिय झाला आहे. तसेच पाकिस्तानकडून भारतात 500 दहशतवादी पाठवण्याच्या प्रयत्न होत आहे, असे लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी म्हटले आहे. ते चेन्नई येथे बोलत होते.
बालाकोट उद्धवस्त करण्यात आल्याने तेथील लोकांनी पलायन केले होते. मात्र, बालाकोटमध्ये पाकिस्तान पुन्हा सक्रिय झाला आहे. बालाकोटमध्ये हालचाली वाढल्या असून पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे, असे बिपिन रावत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
हेही वाचा- अल कायदाचा दहशतवादी मोहम्मद कालिमुद्दीन एटीएसच्या ताब्यात
पाकिस्तान दहशतवाद्यांना भारतात पाठवण्याचा वारंवार प्रयत्न करत आहे. त्यामुळे सातत्याने नियंत्रण रेषेचे उल्लंघन केले जात आहे. परंतु, अशा परिस्थितीला कसे सामोरे जायचे हे लष्कराला चांगलेच माहित आहे. आमचे सैनिक प्रतिकारासाठी तयार आहेत, असे लष्कर प्रमुख म्हणाले. बिपिन रावत पुढे म्हणाले की, आम्ही सतर्क आहोत आणि पाकिस्तानकडून होणारा घुसखोरीचा कोणताही प्रयत्न हाणून पाडण्यात येईल. पाकिस्तान त्याच्या मनसुब्यात कधीच यशस्वी होणार नाही.
जम्मू-काश्मीरमधील संपर्क सुविधा खंडीत करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरही रावत यांनी भाष्य केले. काश्मीर खोऱ्यात पाकिस्तानी आतंकवादी आणि त्यांचे संचालक यांच्यातील संपर्क तुटत आहे. मात्र, खोऱ्यातील लोकांमधील असलेला संपर्क तुटणार नाही, असे ते म्हणाले आहेत.