'बालाकोट'मुळे भाजपला 'राम मंदिरा'च्या मुद्द्याचा विसर - फारूक अब्दुल्ला - farooq abdullah
'पुलवामा हल्ल्यात ४० जवानांना प्राण गमवावे लागल्यानंतर त्या प्रत्येकाच्या कुटुंबीयांची भाजप नेत्यांनी भेट घेतली. छत्तीसगडमध्येही माओवाद्यांच्या हल्ल्यात अनेक जवानांना वीरमरण आले आहे. त्यांच्या कुटुंबीयांना मोदी कधी भेटले नाहीत. हे संशयास्पद आहे,' असे फारूक अब्दुल्लांनी म्हटले आहे.
!['बालाकोट'मुळे भाजपला 'राम मंदिरा'च्या मुद्द्याचा विसर - फारूक अब्दुल्ला](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2852830-731-2890541f-c7dd-4297-b037-da798b6e4d21.jpg)
श्रीनगर - नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी शनिवारी भाजपवर निशाणा साधला. 'भाजपला 'बालाकोट'मुळे 'राम मंदिरा'च्या मुद्द्याचा विसर पडला आहे,' असे एका सभेला संबोधित करताना त्यांनी म्हटले आहे. 'आधी भाजपला राम मंदिर मुद्दा फार महत्त्वाचा वाटत होता. आता तो गेला कुठे? 'बालाकोट'ने गिळला का,' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
'पुलवामा हल्ल्यात ४० जवानांना प्राण गमवावे लागल्यानंतर त्या प्रत्येकाच्या कुटुंबीयांची भाजप नेत्यांनी भेट घेतली. मात्र, छत्तीसगडमध्येही माओवाद्यांच्या हल्ल्यात अनेक जवानांना वीरमरण आले आहे. त्यांच्या कुटुंबीयांना तर मोदी कधी भेटल्याचे ऐकले नाही. हे संशयास्पद आहे. पुलवामा हल्ल्यानंतर मोदींनी अक्षरश: वादळ उठवले. त्यांनी पाकिस्तानमध्ये हल्ला केला. त्यानंतर ते म्हणाले आम्ही ३०० जणांना ठार केले. काही जणांनी ५०० तर काहींनी १००० जणांना ठार केल्याचे सांगितले. त्यानंतर मोदी किती शूर आहेत, हे दाखवण्यासाठी पाकिस्तानचे विमान पाडण्यात आले. मात्र, हे सगळे करून शेतकऱ्यांचे आणि नोकऱ्यांचे प्रश्न झाकून टाकण्यात आले,' असा आरोप अब्दुल्ला यांनी केला आहे.
'मोदींनी एका वर्षांत तरुणांना २ कोटी नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते. म्हणजेच, ५ वर्षांत १० कोटी. कुठे आहेत नोकऱ्या? पेट्रोल, डिझेल, एलपीजीच्या किमती कमी करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, काहीही झाले नाही,' असे अब्दुल्ला म्हणाले. आताच्या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे सांगत त्यांनी काही शक्ती देशातील जनतेत फूट पाडत असल्याचा आरोप केला आहे. तसेच, त्यांनी पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्तींना भाजपशी युती करून त्यांना काश्मीरमध्ये आणल्याबद्दल दोष दिला आहे.