गुवाहाटी : आसामच्या बाघजनमधील तेल विहिरीला लागलेली आग बऱ्यापैकी आटोक्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. तब्बल तीन महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेली ही आग पूर्णपणे आटोक्यात येण्यासाठी आणखी काही आठवडे लागणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
बाघजनमधील पाच नंबरच्या विहिरीला लागलेली आग ही काही प्रमाणात दुसरीकडे वळवण्यात आली आहे. या विहिरीच्या तोंडावरील दाब कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, जेणेकरुन ही विहीरच नष्ट करण्याच्या दिशेने आम्हाला पाऊल उचलता येईल. तेलविहिरीला लागलेली आग आणि वायूगळती ही बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आणण्यात आम्हाला यश मिळाले आहे. ही आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी मात्र आणखी काही आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. ऑईल कंपनीचे इंजिनिअर, अग्निशामक दलाचे कर्मचारी आणि विदेशी तज्ज्ञ हे सर्व युद्धपातळीवर यासाठी काम करत आहेत, अशी माहिती ऑईल कंपनीचे प्रवक्ते आणि उपमहाव्यवस्थापक त्रिदिव हझारिका यांनी सांगितले.