बरनाळा (पंजाब) - ज्याचा कुणी नाही त्याचा देवच वाली असतो असे म्हणतात. मात्र, पंजाबच्या नारायणगड सोहिया गावातील दृष्टीहीन मुलांच्या निवारा गृहाचे प्रमुख असलेले बाबा सूबा सिंह हे अनेक मुलांसाठी आशेचा किरण ठरले आहेत. ते स्वत: दृष्टीहीन आहेत. मात्र, त्यांनी त्यांच्यासारख्या अनेक दृष्टीहीन मुलांसाठी काम करण्याचे ठरवले.
बाबा सूबा सिंह यांनी सन २००० मध्ये असहाय्य, दृष्टीहीन अनाथ, मतिमंद मुलांच्या मदतीसाठी एका आश्रमाची सुरुवात केली. त्यांनी रेल्वे स्थानक, बस स्थानक, रस्त्यावर असलेल्या मुलांना आपल्या आश्रमात आणले आणि त्यांची देखरेख सुरू केली. आज त्यांच्या कुटुंबात जवळपास ५० मुलं आहेत. गुरुद्वारा चंदुआणा साहिब म्हणूनही ओळखले जाते.
दृष्टीहीन, अनाथ मुलांसाठी आशेचा किरण ठरलेले 'बाबा सूबा सिंह' या आश्रमासाठी नारायणगड सोहिया व आसपासच्या नागरिकांनी एक ट्रस्टची स्थापना केली. त्याद्वारे या आश्रमाचा खर्च चालतो. या आश्रमाचं विशेष म्हणजे येथे आलेल्या कोणत्याच मुलाकडून पैसे किंवा इतर काहीही घेतले जात नाही. तसेच, त्यांच्यासाठी सर्व सोयीसुविधा या विनामुल्य पुरवल्या जातात. येथे आलेल्या दृष्टीहीन मुलांसाठी शिक्षणाची सोयदेखील करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी एक शिक्षक नियुक्त करण्यात आला असून तो ब्रेल लिपीच्या माध्यमातून मुलांना शिक्षण देतो. यासह मुलांना धार्मिक ग्रंथांचे पठन, भजन, गुरुबानी आदींचे शिक्षणही दिले जाते.
मुले देवाघरची फुले या ओळींप्रमाणे येथेही या मुलांचे प्रेम आणि मायेने पालनपोषण केले जाते. या आश्रमातील ३० ते ३५ मुले आज बाहेर पडून विविध ठिकाणी सेवा देत आहेत. हे आश्रम असहाय्य मुलांची मदत करून त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठीची प्रेरणा देते. इतकच नव्हे तर त्यांना सक्षम करुन थोर शिख गुरुंच्या तत्त्वांचे पालनही करते. बाबा सूबा सिंहचे हे कार्य आज अनेक गरजु आणि निराधार मुलांसाठी आशेचा किरण ठरत आहे.