डेहराडून -शंकर महादेवाचे अकरावे ज्योतिर्लिंग आणि विश्व प्रसिद्ध भगवान केदारनाथ धामचे दरवाजे बुधवारी विधीपूर्वक पूजा-अर्चा करून उघडण्यात येणार आहेत. यावेळी धामचे पुजारी, रावळ आणि काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पाडला जाणार आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने यावेळी पहिल्यांदाच भाविकांच्या गैरहजेरीत केदारनाथ धामचे दरवाजे उघडले जाणार आहेत. जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत येथे गर्दी टाळण्यात येणार आहे. गंगोत्री धामप्रमाणेच केदारनाथ धाम येथे पंतप्रधान मोदींच्या नावाने पहिली पूजा केली जाणार आहे.
केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्यासाठीची सर्व तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे. बाबा केदारनाथांची डोली केदारधाममध्ये पोहोचली आहे. बुधवारी सकाळी विधीवत केदारनाथाचे दरवाजे उघडले जातील. यासाठी मंदिराला झेंडूच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या निर्देशांचे पालन करत केवळ 18 ते 20 नागरिकांच्या उपस्थितीत धामाचे दरवाजे उघडले जातील. सुरक्षित अंतर पाळण्याकडेही लक्ष दिले जाईल. यंदा पुरोहितांची संख्याही कमी करण्यात आली आहे.
यमुनोत्री आणि गंगोत्री धामाचे दरवाजे उघडल्यानंतर आता बुधवारी केदारधामचे दरवाजे उघडले जातील. येथेदेखील गंगोत्री आणि यमुनोत्री धामाप्रमाणे प्रथम पंतप्रधान मोदींच्या नावाने भगवान आशितोष यांची पूजा केली जाईल. चारीधाम आणि संतांच्या आशीर्वादाने पंतप्रधान मोदी सध्याच्या कोरोना संकटातून देशाला बाहेर काढतील, असे धर्मस्व स्वामी सतपाल महाराज यांनी सांगितले.