नवी दिल्ली- समाजावादी पक्षाचे रामपूर येथील खासदार आझम खान यांनी गुरुवारी लोकसभेत केलेल्या वक्तव्यावर माफी मागावी असे निर्देश लोकसभा अध्यक्षांनी दिले आहेत.
आझम खान यांनी भाजप खासदार रमादेवी यांच्याबाबत वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यावरून शुक्रवारी लोकसभेत गदारोळ निर्माण झाला. महिला खासदारांनी आझम खान यांना निलंबित करण्याची मागणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केली होती. तर काही खासदारांनी अध्यक्षांना ही तक्रार लेखी दिली होती.
यावर सभापतींच्या अध्यक्षतेखाली सर्वदलीय बैठक घेण्यात आली. यामध्ये आझम खान यांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत खासदार दानिश अली, सुप्रिया सुळे, रंजन चौधरी, जयदीप गल्ला, कनिमोझी आणि इतर पक्षाचे खासदार उपस्थित होते.
काय प्रकरण ?
गुरुवारी लोकसभेमध्ये तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरू असताना त्यांनी लोकसभा उपाध्यक्ष रमादेवी यांच्यावर शायरीमध्ये वादग्रस्त टिप्पणी केली होती. सत्ताधारी पक्षाने गदारोळ करत त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला. यावर तुम्ही माझ्या बहिणीसारख्या आहात असे खान म्हणाले. जर मी सभेच्या कार्यवाहीमध्ये चुकीचे काही बोललो असेल तर मी राजीनामा देण्यास तयार आहे, असे म्हणूण माफी न मागता ते सदन सोडून निघून गेले होते.