नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यापासून आयुष मंत्रालय त्याला आळा घालण्यासाठी प्रयत्न करत आहे. यामध्ये आयुष मंत्रालयातील महाराष्ट्र सरकारने तयार केलेल्या टास्क फोर्सचा मोलाचा वाटा राहिला आहे. याचाच एक भाग म्हणून, आता या टास्क फोर्सने 'कोविड-१९ मॅनेजमेंटसाठी एकात्मिक काळजी' या विषयावरील आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन केले आहे. अशा प्रकारचा जगातील हा पहिलाच वेबिनार असणार आहे.
आयुषच्या कोविड-१९ साठीच्या टास्क फोर्सचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. टी. पी. लहाने, सह-अध्यक्ष डॉ. के. आर. कोहली, आणि सदस्य डॉ. जवाहर शाह (आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले होमिओपॅथी डॉक्टर) या तिघांकडे या वेबिनारची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.
आयुषचे मंत्री श्रीपाद नाईक, आणि आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा हे या वेबिनारचे उद्घाटन करणार आहेत.
३ दिवस चालणार वेबिनार..
२९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत हे वेबिनार असणार आहेत. जगभरातील विविध प्रकारच्या उपचार पद्धतींचे आदान-प्रदान करणे हे या वेबिनारचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे. केवळ कोरोना महामारीच नव्हे, तर पुढे येणाऱ्या इतरही वैद्यकीय समस्यांसाठी या वेबिनारचा फायदा होणार आहे.