हैदराबाद - रोहतांग पासला लेह-लडाखशी जोडणारा 'अटल बोगद्या'चे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण केले. रोहतांग पासच्या खाली धोरणात्मक बोगदा बांधण्याचा ऐतिहासिक निर्णय माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी घेतला होता. त्यामुळेच या बोगद्याला त्यांचे नाव देण्यात आले आहे. हा बोगदा सर्वप्रकारच्या वातावरणात प्रवासाला खुला राहणार असून दळणवळणाच्या दृष्टीने हा बोगदा उपयुक्त ठरणार आहे. अटल बोगद्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या बोगद्याविषयी आज आपण जाणून घेऊया....
अटल बोगद्याची लांबी 9.2 किलोमीटर तर, 10 मीटर रुंद आहे. या बोगद्याच्या निर्माणासाठी जवळपास 10 वर्षांचा कालावधी लागला आहे. समुद्र सपाटीपासून 3000 मीटर (सुमारे 10,000 फूट) हिमालयातील पिर पंजाल पर्वतरांगांमध्ये अल्ट्रा मॉडर्न पद्धतीने हा बोगदा खोदण्यात आला आहे. दररोज 3000 कार आणि 1500 ट्रक कमाल 80 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने प्रवास करू शकतील. साधारणपणे 3,200 कोटी खर्च या बोगद्यास आला आहे.
हिमाचल प्रदेश लेह-लडाख भागाला कायम जोडलेला राहणार आहे. सेनेची शस्त्र आणि इतर सामग्री आता वर्षभरात कोणत्याही वेळेत सहजच पोहचवणे शक्य होणार आहे. बोगद्यामुळे मनाली आणि किलाँगमधील 46 किलोमीटरचे अंतर कमी होणार आहे.