जोरहाट - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून देशामध्येही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्यातच नवी दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझमधील धार्मिक कार्यक्रमातून झालेल्या कोरोनाच्या प्रसारामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आसाममधील एक शतक जुनी मशिदीने तबलिगी जमातवरील बंदी घालत ती अनिश्चित काळासाठी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
आसामधली जोरहाट येथे 1835 साली मशिद उभारण्यात आली होती. तबलिगी मरकझमधील धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या तबलिगी जमातीच्या सदस्यांनी मुस्लिम समाजाची नकारात्मक प्रतिमा समाजासमोर ठेवली आहे, त्यामुळे मशिदीच्या व्यवस्थापन समितीने त्यांच्यावर अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे.
आसाम सरकारने आवाहन करूनही तबलिगी जमातीचे सदस्य कोरोनाची चाचणी करण्यासाठी पुढे येत नसून लपून बसली आहेत. त्यांच्या कृत्याने मुस्लिम समाजीची चुकीचा प्रतिमा प्रस्थापित झाली आहे, असे मशिदी व्यवस्थापन समितीचे सचिव रेहमान म्हणाले.
दरम्यान आसाममध्ये 27 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर त्यातील 26 रुग्ण हे तबलिगी जमतीचे आहेत. सरकारने 400 हून अधिक दिल्लीतील कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या तबलिगी जमातीच्या सदस्याची चाचणी घेतली आहे. मात्र, काही जण लपून बसल्यामुळे कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या प्रत्येकाची चाचणी घेता आली नाही.
दिल्लीतील निजामुद्दीन येथे 'मरकज' हा धार्मिक प्रार्थनेचा कार्यक्रम 13 मार्च ते 15 मार्चदरम्यान आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शेकडो लोक सहभागी झाले होते. यातील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. अनेकांचा मृत्यू झाला आहे.