बाक्सा -आसाममध्ये भयंकर पूरस्थिती आहे. याचा फटका माणसांसह प्राण्यांनाही बसत आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील ७० टक्के प्राण्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. यातील ९५ कॅम्पस पाण्याखाली गेले आहेत. याचे गांभीर्य लक्षात घेऊन उद्यान प्रशासनातील बहुतेक वन अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
आसाममधील काझीरंगा उद्यान हे जगभरातील सर्वाधिक संख्येने भारतात असलेल्या एकशिंगी गेंड्यांचे निवासस्थान मानले जाते. येथे मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे पूर आला आहे. या संकटापासून वाचवण्यासाठी प्राण्यांना उद्यानातील उंच भागांवर, टेकड्यांवर हलवण्यात आले आहे.
याशिवाय, शिकाऱ्यांपासून प्राण्यांच्या जीवाला धोका असल्यामुळेही वन खात्याला सावध रहावे लागत आहे. राष्ट्रीय महामार्गावर (एनएच ३७) याची शक्यता अधिक आहे. हा महामार्ग आसाममधील करीमगंजजवळील सुताराकांडी येथून सुरू होत असून मणिपूरमधील भालीपर्यंत जातो. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहनांना 'टाईम कार्ड' दिले जात आहे. प्राण्यांची शिकार होऊ नये, यासाठी ही काळजी घेण्यात येत आहे. वनरक्षकांना रात्रपाळीसाठीही तैनात करण्यात आले आहे.
दरम्यान, भारतीय लष्करासह एसडीआरएफ आणि शहर प्रशासनाने बचावकार्य करत १५० लोकांनाही सुरक्षित स्थळी नेले आहे. हे लोक बाक्सा जिल्ह्यातील बालीपूर चार येथे अडकले होते. ओडालगुडी गावात तात्पुरत्या स्वरूपाची निवारागृहे उभारण्यात आली आहेत. येथे हलवलेल्या लोकांना राहण्यासह अन्नही पुरवण्यात येत आहे. यामध्ये ५५ महिला, ४० पुरुष, २५ ज्येष्ठ नागरिक आणि ३० लहान मुलांचा समावेश आहे. मागील काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे बेकी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे बालीपूर चार येथे पुराचे पाणी आले आहे.