दिसपूर : आसाममधील जोरहात जिल्हा न्यायालयाने एका डॉक्टरच्या मॉब लिंचिंग प्रकरणी २५ जणांना शिक्षा सुनावली. २०१९मध्ये जिल्ह्यातील तेओक टी इस्टेट परिसरातील एका रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या ७३ वर्षीय डॉक्टरला जमावाने मारहाण केली होती. यामध्ये जबर जखमी झालेले देबेन दत्ता यांचा पुढे उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता.
जिल्हा आणि सेशन न्यायाधीश रॉबिन फुकन यांनी याबाबत निर्णय देत, भारतीय दंडसंहिता, आसाम मेडिकेअर सर्विस पर्सन आणि मेडिकेअर सर्विस इन्स्टिट्यूशन (हिंसा प्रतिबंद आणि मालमत्तेचे नुकसान) कायदा २०११च्या विविध कलमांतर्गत २५ जणांना दोषी ठरवले. या सर्वांच्या शिक्षेबाबत १९ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, या खटल्याची सुनावणी सुरू असण्याच्या कालावधीमध्ये एका आरोपीचा मृत्यू झाला होता. त्या आरोपीविरुद्धचा निर्णय अबाधित ठेवण्यात आला.