जयपूर -काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांच्या समर्थकांनी राजीनामे दिल्यानंतर मध्यप्रदेशमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. यावर राजस्थानचे मुख्यमंत्री गहलोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी उचललेले हे पाऊल म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी आहे. लोकांचा विश्वास आणि पक्षाच्या विचारधारेसोबत सिंधियांनी विश्वासघात केला आहे, असे गहलोत म्हणाले.
'सिंधियांनी स्वार्थासाठी लोकांचा विश्वासघात केला' काँग्रेसचे तरुण आणि प्रभावशाली नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज पक्षाचा राजीनामा दिला. ते १२ मार्चला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. सिंधिया यांच्यापाठोपाठ २२ काँग्रेस आमदारांनीही राजीनामे दिल्यामुळे कमलनाथ सरकार अडचणीत आले आहे.
सिंधिया यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली. तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सिंधियांवर जोरदार टीका केली आहे. "भाजप जेव्हा देशाची अर्थव्यवस्था, संस्थाने, समाज आणि न्यायपालिका या सर्वांचे नुकसान करत असताना, अशा राष्ट्रीय संकटावेळी भाजपसोबतच हातमिळवणी करणाऱ्या नेत्यांचा स्वार्थ आपल्याला दिसून येतो. ज्योतिरादित्य सिंधियांनी लोकांचा विश्वास, आणि त्यासोबतच विचारधारेसोबतही विश्वासघात केला आहे. अशा लोकांकडे पाहून हेच सिद्ध होते, की ते सत्तेशिवाय काहीच करू शकत नाहीत", अशा आशयाचे ट्विट गहलोत यांनी केले आहे.
हेही वाचा :एक एप्रिलपासून पाच दिवसांचा आठवडा रद्द!