नवी दिल्ली - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाला एक महिना झाला असून अद्याप सरकारकडून यावर तोडगा काढण्यात आला नाही. आंदोलनाच्या मुद्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला घेरलं आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. मोदी सरकार असंवेदनशील असून कामचोर आहे. शेतकरी गेल्या 39 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. मात्र, सरकार शेतकऱ्यांचे मनोबल कधी तुटेल आणि आंदोलन समाप्त होईल, याची वाट पाहत आहे, असे गेहलोत म्हणाले. तसेच शेतकरी अहिंसेचा मार्ग स्वीकारून शांततेत आंदोलन करत आहेत, असेही गेहलोत म्हणाले.
मोदी-शाह यांनी आंदोलनाकडे दुर्लक्ष केले आहे. मात्र, त्यांना याची मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. अमेरिकेतील नागरिकांनी ट्रम्प यांच्या सरकारला सत्तेतून बाहेर फेकले. त्याचप्रकारे भारतीय जनताही मोदी-शाह यांचा अहंकार दूर करेल आणि त्यांना पायउतार व्हाव लागेल, असे गेहलोत म्हणाले. संपूर्ण शेतकर्यांचे भवितव्य ठरविण्याचा अधिकार केंद्र सरकारला नाही. मोदी सरकार देशाला उद्धवस्त करत आहे. त्यांनी लोकांना टाळ्या आणि थाळ्या वाजवायला लावल्या. एक दिवस ते देशाचा बँडसुद्धा वाजवतील, अशी टीका गेहलोत यांनी केली.
भाजपाचा लोकशाहीवर विश्वास नाही -
केंद्र सरकार आणि भाजपामध्ये बसलेल्या लोकांना लोकशाहीवर विश्वास नाही. त्यांची हुकूमशहाची प्रवृत्ती आहे. या लोकांना हा देश हिंदू राष्ट्राकडे घेऊन जायचा आहे. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचे काम करत आहेत. त्यांचा हेतू बरोबर नाही. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून काँग्रेसने महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. देशाच्या स्वातंत्र्य आणि ऐक्यासाठी काँग्रेसच्या लोकांनी आपले बलिदान दिले आहे, असेही गेहलोत म्हणाले.