मोदी-शाह विरुद्ध फक्त राहुल गांधी धैर्याने लढू शकतात, गहलोतांनी व्यक्त केला विश्वास - ASHOK GEHLOT on RAHUL GANDHI
मोदी आणि अमित शाह यांचा सामना फक्त राहुल गांधी करु शकतात असा विश्वास राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी व्यक्त केला आहे.
जयपूर - नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा सामना फक्त राहुल गांधी करु शकतात असा विश्वास राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी व्यक्त केला आहे. राहुल गांधी मुद्यांवर आधारित राजकारणाने मोदी-शाह यांच्याविरुद्ध लढू शकतात. हे मी गेल्या 5 वर्षांपासून सांगत आहे, असे गहलोत म्हणाले.
मोदी आणि अमित शाह यांचा हिंमतीने आणि धैर्याने सामना राहुल गांधी करु शकतात. हा माझा विश्वास आहे. राहुल गांधींनी 2017 मध्ये गुजरात निवडणुकीसाठी परिश्रम घेतले. त्यांनी शेतकरी समस्या, राफेल, बेरोजगार आणि तरुणांशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, मोदींनी भावनिक प्रचार मोहीम राबविली. निवडणूक जिंकण्यासाठी मोदी काहीही करू शकतात, अशी टीका गहलोत यांनी मोदींवर केली.
देशाची आर्थिक परिस्थिती ढासळत असल्याचे मनमोहन सिंग, रघुराम राजन, आणि अन्य अर्थशास्त्रज्ञांनी सांगितले आहे. मात्र भाजप अर्थव्यवस्था ठीक करेल, असे वाटत नसल्याचे गहलोत म्हणाले.
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या निषेधार्थ ईशान्य भारतामधील आंदोलन चिघळले आहे. निदर्शने केली जात आहेत. परिस्थिती आटोक्यात आण्यासाठी राज्यात सैन्य पाठवावे लागत असून देशातील परिस्थिती चांगली नसल्याचे गहलोत म्हणाले.
काँग्रेसच्या नेत्यांची प्रतिमा खराब करण्याचा भाजपचा अजेंडा आहे. परंतु त्यांना यश आले नाही. देशातील नागरिकांचा गांधी कुटुंबावर पूर्ण विश्वास आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने 'काँग्रेस मुक्त भारत' बद्दल बोलणे बंद केले आहे. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे युती सरकार विलक्षण परिस्थितीत सत्तेवर आले. हे सरकार लोकांच्या अपेक्षांवर खरे उतरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.