नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतामध्ये कोरोना ग्रस्तांची संख्या वाढत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी या कर्मचाऱ्यांचे कौतूक केले आहे.
कोरोनाविरुद्ध लढ्यात देशातील आशा, परिचारिका आणि अंगणवाडी सेविका जीव धोक्यात घालून धैर्याने व समर्पणाने काम करीत आहेत. गरजेच्या वेळी देशाची सेवा करणे ही सर्वात मोठी देशभक्ती आहे. हेच खरे देशभक्त आहेत. जे संकटाच्या वेळी लोकांना सुरक्षित ठेवण्याचे काम करत आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.
मी देशाच्या सेवेसाठी प्रत्येक सेवा कर्मचार्याला सलाम करतो आणि त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो, असेही राहुल गांधी म्हणाले.
देशभरात गेल्या १२ तासांमध्ये ५४७ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ६,४१२ झाली आहे.देशातील एकूण रुग्णांपैकी ५,७०९ रुग्ण हे अॅक्टिव आहेत. तर आतापर्यंत सुमारे ५०४ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. तसेच, देशात गेल्या १२ तासांमध्ये कोरोनाच्या ३० नव्या बळींची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण बळींचा आकडा १९९ वर पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.