हैदराबाद -अयोध्या प्रकरणावर मार्ग काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे एआयएमआयएम पक्षाचे सर्वोसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी स्वागत केले. मात्र, न्यायालयाने नेमलेल्या त्रिसदस्यीय मध्यस्थ समितीच्या एका सदस्याबद्दल त्यांनी शंका व्यक्त केली आहे. ही व्यक्ती निःपक्ष नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
अयोध्या राम मंदिर आणि बाबरी मशिदीचा प्रश्न मध्यस्थता करून सोडवण्याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने घेतला. त्यासाठी तीन सदस्यांची एक समिती न्यायालयाने नेमली आहे. त्या समितीची कमान सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश इब्राहिम कलीफुल्ला यांचा हातात सोपवण्यात आली आहे. तर अध्यात्मिक गुरू श्री. श्री. रविशंकर आणि वरिष्ठ वकिल श्री राम पंचू यांचा या समितीत समावेश आहे.
असदुद्दीन ओवैसी यांनी न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, रविशंकर यांच्या नावावर त्यांना शंका आहे. श्री. श्री. रविशंकर हे या मुद्यावर निष्पक्ष नाहीत, असे ओवैसी यांचे म्हणणे आहे. तसेच रविशंकर यांनी यापूर्वी राम मंदिराचा मुद्यावर देशाला धमकावले आहे, असा आरोप त्यांनी लावला. राम मंदिर मुद्यावर लवकर तोडगा काढला नाही तर, देशामध्ये सीरिया सारखे वातावरण तयार होईल, असे रविशंकर यांनी म्हटले होते याची आठवण ओवैसी यांनी करून दिली.
त्रिसदस्यीय समितीमध्ये उच्च न्यायालयाची मध्यस्थता नियम ६ मध्ये निष्पक्ष व्यक्ती निवडण्याची तरतूद असताना न्यायालयाने रविशंकर यांना निवडणे टाळायला हवे होते, असा युक्तीवाद त्यांनी केला आहे. मात्र, न्यायालयाने त्यांची नेमणूक केल्यानंतर त्यांनी कोणताही पक्ष घेऊ नये, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.