हैदराबाद - एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यावर भारतीय मुस्लिमांबाबत केलेल्या विधानावरुन टीका केली आहे. तुमच्या विचारसरणीला देशात मुस्लिमांना दुय्यम दर्जाचं नागरिकत्व द्यायचं आहे, अशा शब्दांत त्यांनी भागवतांवर निशाणा साधला.
'तुम्हाला मुस्लिमांना दुय्यम दर्जाचे नागरिक बनवायचे आहे'; भागवतांच्या विधानानंतर ओवेसींचे टिकास्त्र
भारतीय मुस्लीम सर्वाधिक समाधानी आहेत. इतकंच नव्हे तर देशाच्या संस्कृतीवर जेव्हा हल्ला होतो तेव्हा सर्वधर्मीय एकत्र येतात, असे विधान मोहन भागवत यांनी केले होते. त्यावर असदुद्दीन ओवेसींनी त्यांच्यावर टिका केली आहे.
एकामागून एक केलेल्या काही ट्विट्सद्वारे ओवेसींनी भागवतांना काही प्रश्नही विचारले आहेत, “मुस्लिमांच्या आनंदाचं परिमाण काय आहे? भागवत नावाचा माणूस आपल्याला कायम हेच सांगत असतो की बहुसंख्यकांबाबत आपण कायम कृतज्ञ असलं पाहिजे. मात्र, राज्यघटनेने दिलेल्या आत्मसन्मानाचा आदर केला जातो की नाही हे आमच्या आनंदाचं परिमाण आहे. त्यामुळे आम्ही किती आनंदी आहोत ते तुम्ही आम्हाला सांगू नका कारण तुमच्या विचारसरणीला देशात मुस्लिमांना दुय्यम दर्जाचं नागरिकत्व द्यायचं आहे. आमच्या स्वतःच्या देशात आम्ही बहुसंख्यकांबाबत कृतज्ञ राहिलं पाहिजे हे मला तुमच्याकडून ऐकण्याची गरज नाही. आम्ही बहुसंख्य लोकांचा सद्भावनेचा शोध घेत नाही, जगातील मुस्लिम सर्वात आनंदी आहेत की नाही याच्या स्पर्धेतही आम्ही नाही, आम्हाला फक्त आमचे मूलभूत हक्क हवे आहेत.”
शुक्रवारी एका मुलाखतीत मोहन भागवत यांनी म्हटलं होतं की, “भारतीय मुस्लीम सर्वाधिक समाधानी आहेत. इतकंच नव्हे तर देशाच्या संस्कृतीवर जेव्हा हल्ला होतो तेव्हा सर्वधर्मीय एकत्र येतात. ज्यांच्या स्व:हिताला बाधा निर्माण होते तेव्हाच कट्टरतावाद आणि फुटीरतावाद पसरविला जातो. एखाद्या देशावर राज्य करणारा विदेशी धर्म अजूनही अस्तित्वात आहे, असं उदाहरण फक्त भारतात बघायला मिळतं. भारताने अन्य धर्मीय अनुयायांना हक्क दिले, तसे पाकिस्तानने दिले नाहीत त्यांनी मुस्लीमांसाठी स्वतंत्र देश निर्माण केला”.