हैदराबाद -एमआयएमचे अध्यक्ष असुद्दीन ओवैसी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघा (आरएसएस)वर कडाडून टीका केली आहे. मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी जमीन वादाप्रकरणाची याचिका मथुरा जिल्हा न्यायालयाने स्वीकारली आहे. त्यानंतर संतप्त झालेल्या ओवैसींनी टि्वटकरून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. मथुराचे प्रकरण हे आरएसएसचेच कारस्थान असून आता आपण सावध होणे गरजेचे असल्याचे ओवैसी म्हणाले.
बाबरी मशीद आणि रामजन्मभूमी प्रकरणाच्या निकालामुळे संघाला आणखी बळ मिळाले आहे. त्यामुळे मथुरा प्रकरणात जे होण्याची भीती होती नेमके तेच होत आहे. आपण आताच विरोध केला नाही तर भविष्यात संघ परिवार यालाही हिंसक वळण देण्याची शक्यता आहे, असे ट्विट ओवैसींनी केले आहे.
मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संघ आणि शाही ईदगाह ट्रस्ट यांच्यातील वाद १९६८लाच परस्पर सामंजस्यांतून मिटवण्यात आला होता. त्यामुळे कुणीतरी जाणून-बुजून हा वाद उकरून काढण्याशिवाय हे प्रकरण समोर येणे शक्य नाही. या कारस्थानामागे आरएसएसच आहे, असे मत ओवैसींनी यापूर्वीच मांडलेले आहे.
काय आहे मथुरा प्रकरण -
श्रीकृष्ण जन्मभूमी जमीन वादावरील याचिका मथुरा जिल्हा न्यायालयाने स्वीकारली आहे. २ ऑक्टोबरला मथुरा दिवाणी न्यायालयाने याचिका फेटाळली होती. मात्र, आता जिल्हा न्यायालयाने याचिका स्वीकारली आहे. मथुरेतील श्रीकृष्ण मंदिराजवळील शाही ईदगाह मशीद काढून टाकण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी १८ नोव्हेंबरला ठेवली आहे. श्रीकृष्ण जन्मस्थान परिसर सुमारे साडेतेरा एकरचा आहे. यात मंदिर आणि जवळच शाही ईदगाह मशीद आहे. ही मशीद हिंदू मंदिराचा काही भाग पाडून बांधण्यात आल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. २६ सप्टेंबरला काही भाविकांनी या प्रकरणी मथुरा जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुघल सम्राट औरंगजेबाने १७ व्या शतकात हिंदू मंदिराचा काही भाग पाडून त्याजागी मशीद बांधली होती. मशीद बेकायदेशीर जागेवर असून मंदिराच्या जागेतील अतिक्रमण काढून टाकण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.