हैदराबाद - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमीचा कार्यक्रम नागपूरात पार पडला. यावेळी बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला (सीएए) होत असलेल्या विरोधावर भाष्य केले. सीएए कायदा कोणत्याही विशिष्ट धर्माला लक्ष्य करत नाही. मात्र, यावरून काहीजण मुस्लिम नागरिकांची दिशाभूल करत असल्याचे वक्तव्य मोहन भागवत यांनी केले होते. त्याला अससुद्दीन ओवैसी यांनी उत्तर दिले आहे.
काय म्हणाले ओवैसी ?
'दिशाभूल करायला आम्ही लहान मुलं नाहीत. सीएए आणि एनआरसी नक्की कशासाठी आहेत, यावर भाजपने भाष्य केलेले नाही. जर हे मुस्लिमांविरोधात नसेल तर सीएए कायद्यातून सर्व धार्मिक संदर्भ काढून टाकणार का ? हे समजून घ्या. आम्हाला भारतीयत्व सिद्ध करायला लावणाऱ्या कायद्यांचा पुन्हा पुन्हा विरोध करू', असे ओवैसी म्हणाले.
खोटा प्रचार करून दिशाभूल होतेय
विजयादशमीनिमित्त नागपूरातली रेशीमबागेत आरएसएसचा कार्यक्रम पार पडला. त्यात बोलताना मोहन भागवत यांनी सीएए आणि एनआरसी कायद्यावर वक्तव्य केले. ' सीएए कायदा कोणत्याही धर्माला लक्ष्य करत नाही. मुस्लिम लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी हा कायदा आणल्याचा खोटा प्रचार करून मुस्लिम बांधवांची दिशाभूल करण्यात येत आहे. यामुळेच पुन्हा कायद्याला विरोध होत आहे', असे मोहन भागवत म्हणाले होते.