हैदराबाद- शहरातील राज्य शासकीय गांधी रुग्णालयाच्या कनिष्ठ डॉक्टरांनी गुरुवारीही संप सुरू ठेवला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री इटाला राजेंदर यांच्याशी बोलल्यानंतरही काहीच फायदा न झाल्याने आंदोलन सुरू ठेवण्यात आले आहे. कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरवर हल्ला केल्यानंतर कनिष्ठ डॉक्टरांनी मंगळवारी रात्रीपासून निषेध आंदोलन सुरू केले.
आज तेलंगणा कनिष्ठ डॉक्टर असोसिएशनने (टीजेयुडीए) रुग्णालय अधीक्षकांना पत्र लिहून त्यांचा संप कायम राहील, अशी घोषणा केली. हैदराबादमधील गांधी हॉस्पिटल हे राज्यातील एकमेव सरकारी रुग्णालय आहे, जिथे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यामुळे येथे डॉक्टरांवर ताण येत असून राज्यातील इतर रुग्णालयांमध्ये देखील रुग्णांना दाखल करून घ्यावे, अशी डॉक्टरांची इच्छा आहे.