श्रीनगर -जम्मू-कश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण दिले आहे. 'त्या माझ्या वैयक्तिक भावना होत्या. एक राज्यपाल म्हणून मी असे वक्तव्य करायला नको होते', असे ते म्हणाले आहेत.
'राज्यातील भ्रष्ट्राचारामधून आलेल्या उदासीनतेमुळे आणि रागातून मी ते वक्तव्य केले. राज्यपाल म्हणून मी, असे वक्तव्य करायला नको होते. त्या माझ्या वैयक्तिक भावना होत्या' असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
तरुण मुले हातात बंदूक घेऊन लोकांना मारत आहेत. पीएसओ, एसडीओंना मारत आहेत. त्यांना का मारत आहात? ज्यांनी तुमच्या देशाला लुटले त्यांना मारा, ज्यांनी काश्मीरचा खजाना लुटला त्यांना ठार करा. बंदूक हातात घेऊन काहीच साध्य होणार नाही, असे वक्तव्य सत्यपाल मलिक यांनी केले होते.
मलिक यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी टि्वट करुन टीका केली होती. 'याप्रकारचे वक्तव्य करण्यापूर्वी मलिक यांनी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवायला हवी होती', अशी टीका केली.