'दिल्लीकरांना मी दहशतवादी वाटत असेल तर कमळाचं बटन दाबा' - दिल्ली मतदान
दिल्लीकरांना मी दहशतवादी वाटत असेल त्यांनी आठ तारखेला कमळाचे बटन दाबावे आणि जर मी दिल्लीसाठी देशासाठी काम केले, असे वाटत असले तर 'आप' ला मतदान करावे, असे केजरीवाल म्हणाले.
!['दिल्लीकरांना मी दहशतवादी वाटत असेल तर कमळाचं बटन दाबा' arvind kejriwal](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5964674-504-5964674-1580889476322.jpg)
नवी दिल्ली- राजधानी दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. प्रचारात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. भाजप खासदार परवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांना दहशतवादी म्हटले होते. त्याला केजरीवाल यांनी उत्तर दिले आहे.
'मी जीवनामध्ये स्वत:साठी आणि कुटुंबासाठी काहीही केले नाही. सर्वकाही देशासाठी केले. आयआयटीमध्ये मी शिक्षण घेतले. मात्र, मी परदेशात गेलो नाही, माझ्याबरोबरचे ८० टक्के विद्यार्थी परदेशात नोकरीसाठी गेले. मात्र, मी देशातच थांबलो. उत्पादन शुल्क विभागात आयुक्तपदी नोकरी केली. ती नोकरी सोडून अण्णा हजारेंसोबर भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात सहभागी झालो' असे केजरीवाल म्हणाले.
'भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकण्यासाठी दोन वेळा १५-१५ दिवसांचे उपोषण केले. मधुमेहाचा आजार असतानाही १५ दिवस उपाशी राहिलो. मी जिवंत राहणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले, तरी मी उपोषण केले. इन्सुलिनचे इंजेक्शन घेत असतानाही मी उपोषण केले. माझे जीवन देशासाठी वाहून घेतले. विद्यार्थ्यांना शिकवले, वृद्धांना माता वैष्णौदेवी, हरिद्वार येथे दर्शन करायला घेऊन गेलो. लोकांचे उपचार केले, मग मी दहशतवादी कसा,' असा सवाल त्यांनी केला. परवेश वर्मा यांच्या वक्तव्याने दुःख झाल्याचे केजरीवाल म्हणले.
दिल्लीकरांना मी आतंकवादी वाटत असेल त्यांनी आठ तारखेला कमळाचे बटन दाबावे आणि जर मी दिल्लीसाठी देशासाठी काम केले, असे वाटत असले तर 'आप' ला मतदान करावे, असे केजरीवाल म्हणाले.