महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आपल्या भाषेचे जतन करण्यासाठी अरुणाचलच्या युवकाने तयार केली वांछो वर्णमाला... - भाषाशास्त्र

अरुणाचल प्रदेशमधील वांछो या आदिवासी लोकांची भाषा ही लिखित स्वरूपात नव्हती. त्यामुळे ती जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर होती. बानवांग लोसु या भाषाशास्त्राच्या विद्यार्थ्याने या भाषेची वर्णमाला तयार करत, ती युनिकोड स्वरुपात देखील उपलब्ध केली आहे. त्यामुळे आता संगणकावर देखील ती भाषा लिहिता येऊ शकेल.

वांछो

By

Published : Sep 8, 2019, 5:21 PM IST

पुणे - ईशान्य भारतातील काही भागांमध्ये बोलल्या जाणाऱ्या 'वांछो' भाषेचे जतन करण्यासाठी भाषाशास्त्राच्या विद्यार्थ्याने पुढाकार घेतला आहे. त्याने स्वतंत्र्यपणे नवीन अशी वांछो वर्णमाला तयार केली आहे. बानवांग लोसु असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.


अरुणाचल प्रदेशमधील वांछो या आदिवासी लोकांची भाषा ही लिखित स्वरूपात नव्हती. त्यामुळे ती जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर होती. लोसु याने या भाषेची वर्णमाला तयार करत, ती युनिकोड स्वरुपात देखील उपलब्ध केली आहे. त्यामुळे आता संगणकावर देखील ती भाषा लिहिता येऊ शकेल.


लोसु सध्या पुण्यातील डेक्कन महाविद्यालयातून भाषाशास्त्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. तब्बल १२ वर्षे मेहनत घेऊन, आणि अनेक अडचणींना मात देत त्याने ही वर्णमाला तयार केली. या भाषेचे भाषांतर करणे हे अवघड काम होते, कारण वांछो भाषेतील बरेचशे उच्चार इतर भाषांमध्ये उपलब्ध नव्हते. २००३ मध्ये 'वांछो स्क्रिप्ट' या पुस्तकामध्ये ठराविक शब्द आणि वाक्ये असलेले पुस्तक प्रकाशित केले होते, ज्याचा वापर आता जवळपास २० सरकारी शाळांमध्ये ही भाषा शिकवण्यासाठी होतो आहे.


नामशेष होत चाललेल्या भाषांकडे लक्ष वेधले जावे यासाठी संयुक्त राष्ट्रांनी २०१९ हे वर्ष 'स्थानिक भाषांचे वर्ष' म्हणून जाहीर केले आहे. भारतातील भाषांपैकी १९७ भाषा या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांपैकी ८९ भाषा या ईशान्य भारतातील आहेत. आणि एकट्या अरुणाचल प्रदेशमध्ये त्यांपैकी ३४ भाषा आहेत.


इतर आदिवासी भाषिकदेखील या वांछो भाषेतील अक्षरे वापरू शकतात, त्यांच्या भाषेची वर्णमाला तयार करण्यास देखील आपण तयार असल्याचे देखील लोसु याने स्पष्ट केले. वांछो भाषा ही फक्त अरुणाचल नाही, तर नागालँड, आसाम तसेच म्यानमार आणि भूटानमध्ये देखील बोलली जाते. आपली भाषा, संस्कृती ही आपण जपली नाही तर ती नामशेष होऊन जाईल. कोणतीही भाषा उच्च वा नीच नसते, सर्व भाषा या तितक्याच महत्त्वाच्या आहेत, असे लोसु याने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details