नवी दिल्ली- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर आज (रविवार) दुपारी अंत्यसंस्कार होणार आहेत. यमुना नदीकाठी निगमबोध स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनानंतर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आता त्यांचे पार्थिव भाजप मुख्यालयात आणण्यात आले.
माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर आज अंत्यसंस्कार - अंत्यसंस्कार
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर आज (रविवार) दुपारी अंत्यसंस्कार होणार आहेत.
दुपारी २ वाजेपर्यंत अरुण जेटली यांचे पार्थिव दिल्लीतील भाजप मुख्यालयात ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्याठिकाणी भाजप नेते, कार्यकर्ते आणि नागरिक त्यांना श्रद्धांजली वाहणार आहेत. त्यानंतर अंत्यविधीसाठी त्यांचे पार्थिव निगमबोध घाट येथे नेण्यात येणार आहे.
शनिवारी अरुण जेटलींचे पार्थिव एम्स रुग्णालयातून त्यांच्या घरी आणण्यात आले. काल दुपारी १२ वाजून ७ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक महिने आजाराशी सामना करणाऱ्या जेटलींनी वयाच्या ६६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. थकवा, श्वसनाचा त्रास आणि अस्वस्थ वाटू लागल्याने जेटली यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आजाराशी त्यांची झुंज अपयशी ठरली.