मानवतेस ज्ञात असलेला शेती हा प्राचीनतम व्यवसाय काळाचे हल्ले सहन करीत सुखदरित्या तगला आहे. अनेक आव्हानांचा सामना करुनही टिकलेल्या आजच्या काळातील शेतीचे स्वरुप हे प्राचीन काळाच्या तुलनेत अधिक शुद्ध व विस्तृत झाले आहे. हवामान बदलापासून ते गुणवत्ता व प्रमाणासाठी सतत वाढत असलेल्या मानवी मागणीपर्यंत; शेतीचे हे क्षेत्र बदलाला सामोरे गेले आहे आणि आश्चर्यकारक तांत्रिक नावीन्याच्या पाठिंब्याच्या जोरावर ठाम व सकसपणे प्रगती करत आहे. उदाहरणार्थ, भारत हा दैनंदिन जीविकेसाठी अन्नाच्या आयातीवर अवलंबून असलेला देश होता. परंतु, आज निव्वळ राष्ट्रीय अन्न सुरक्षेचे नव्हे; तर जागतिक अन्न सुरक्षेचे उद्दिष्ट साध्य करत आपण अन्न उत्पादनामध्ये आघाडीवर आहोत. हरित क्रांती आणि त्यानंतर झालेल्या तांत्रिक प्रगतीमुळे हरित क्रांतीच्या आधीच्या काळातील किरकोळ ५ कोटी टनापासून ते आज भारताचे अन्न उत्पादन विक्रमी ३० कोटी टन इतके झाले आहे. तेव्हापासून सुधारित बियाणे, पीक व्यवस्था वा पीक सुरक्षा अशा विविध माध्यमामधून भारतीय कृषि क्षेत्राचा तंत्रज्ञान हा एक अविभाज्य घटक बनला आहे. माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानामुळे अधिक अचूक, उत्पादक आणि काहीवेळा आभासी झालेली शेतीची संकल्पना ही अधिक प्रगल्भ झाली आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये होणारा कृत्रिम बुद्धिमतेचा उदय हा आता आश्चर्यकारक वाटत नाही.
मानवी विचारांशी संलग्न केली जाऊ शकणारी कृत्रिम बुद्धिमत्ता ही एक संज्ञानात्मक प्रक्रिया आहे; मात्र त्याचवेळी ती अधिक नेमकी व अचूक आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन निर्णय प्रक्रियेचे स्वयंचलन करणे शक्य आहे. यामुळे, वेगवेगळ्या पातळ्यांवर निर्णय प्रक्रियेचा सहभाग असलेल्या शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता ही तांत्रिक दृष्ट्या अत्यंत कालसुसंगत ठरते. ग्राहकासाठी अन्न सुरक्षेची खात्री आणि शेतकऱ्यांना अर्थ प्राप्तीची सुरक्षा अशी तारेवरची कसरत सुरु असताना भविष्यातील शेतीला चूक परवडणारच नाही. यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा भक्कम आधार असलेल्या शेतीचा स्वीकार जगाने मनःपूर्वक सुरु केला आहे. एका व्यावसायिक अहवालानुसार, शेती क्षेत्रामधील कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित घटकाची व्याप्ती २०२५ च्या अखेरपर्यंत १५५ कोटी डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
शेती क्षेत्रातील जवळजवळ सर्वच पातळ्यांवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग होण्यासारखा आहे; मात्र विशेषत: पीकाची निवड, पीकावरील देखरेख आणि भविष्यातील अंदाज (प्रेडिक्शन) वर्तविण्याच्या दृष्टिकोनामधून कृत्रिम बुद्धिमत्ता संवेदनशील आहे. भारतीय शेतीच्या सकल आर्थिक उत्पन्नामध्ये ६०% वाटा हा पावसावर आधारित शेतीचा आहे. या पार्श्वभूमीवर लहरी हवामानाच्या संकटावर उपाय म्हणून आधारभूत योजना असणे अत्यंत आवश्यक आहे. अति ओलसर राहत असलेली माती वा सातत्यपूर्ण कोरड्या हवामानामुळे कदाचित काही वेळा एखाद्या विशिष्ट भागामधील पारंपारिक पीक घेणे शक्य होणार नाही. अशा पार्श्वभूमीवर हवामानाची स्थिती, बियाण्यांची उपलब्धता, स्थानिक प्राधान्य, बाजारमूल्य आणि बाजारामधील मागणी अशा अनेक घटकांचा विचार करता त्या विशिष्ट भागामध्ये एखादे पर्यायी पीक सुचविण्याकरिता कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग होतो. भूचेतना या प्रकल्पांतर्गत मायक्रोसॉफ्ट या कंपनीने निमशुष्क उष्णकटिबंधीय क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पीक संशोधन केंद्राबरोबर खरीप मोसमासाठी पेरणीविषयक सल्ला सेवा मर्यादित स्तरावर सुरु केली आहे. या सेवेंतर्गत विकसित करण्यात आलेल्या ऍपच्या माध्यमामधून सहभागी शेतकऱ्यांना पेरणीच्या सर्वोत्तम दिवशी पेरणीविषयक सूचना पाठविण्यात येते.
याहीपुढे, संपूर्ण पीक देखरेख व माती देखरेखीच्या माध्यमामधून शेतीमधील कृत्रिम बुद्धिमत्तेचे आणखी एक औत्सुक्यपूर्ण दालन उघडे झाले आहे. पीकवाढीच्या मोसमामध्ये प्रतिमाधारित उपाययोजनेमुळे पीकांच्या स्थितीविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळते. याचमुळे शेतकऱ्यास भविष्यातील धोक्याविरोधात उपाययोजनेसाठी पर्यायही पुरविले जातात. सखोल ज्ञान आणि प्रतिमा प्रक्रियाधारित प्रारुपांमुळे पीकावरील आजार वा कीड ओळखता येऊ शकते. या आजाराचे निदान कशा प्रकारे करता येईल वा त्यास रोखता कशा प्रकारे येईल, यासंदर्भातील शिफारस कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रारूपांच्या साहाय्याने करता येऊ शकेल. प्रतिमा निदान आणि सखोल ज्ञानावर आधारित प्रारुपांच्या मदतीने प्रयोगशाळेतील चाचणी सुविधेशिवायही मातीचे परीक्षण करणे शक्य झाले आहे. उपग्रहांकडून येणाऱ्या संदेशांबरोबर एकत्रित करण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित योजना; त्याचप्रमाणे शेतजमिनीमध्ये काढण्यात आलेल्या स्थानिक प्रतिमा, यांमुळे मातीचे आरोग्य पुनरुज्जीवित करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे शेतकऱ्यांना आता शक्य झाले आहे.