लखनऊ - आठ पोलिसांच्या हत्येला जबाबदार असलेला कुख्यात गुंड विकास दुबेला उज्जैन शहरातील महाकाल मंदिरातून ताब्यात घेण्यात आले आहे. कानपूरला पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर विकास दुबे साथीदारांसह फरार झाला होता. आठ दिवसानंतर तो पोलिसांना सापडला आहे. मात्र, ही अटक होती की आत्मसमर्पण? योगी सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केली आहे.
‘कानपूरमधील पोलिसांवरील गोळीबारातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती वृत्तपत्रातून येत आहे. जर हे खरे असेल तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट करावे की, विकास दुबेला अटक करण्यात आली की त्याने आत्मसमर्पण केले. तसेच सरकारने विकास दुबेचे ’कॉल डिटेल्स' सार्वजनिक करावे, त्यामुळे त्याला कोणी मदत केली हे स्पष्ट होईल, असे अखिलेश यादव म्हणाले.
एका गुन्ह्यात गुंड विकास दुबेला अटक करण्यासाठी पोलीस पथक त्याच्या कानपूरमधील घरी गेले होते. पोलीस घरी आल्यावर दुबेने साथीदारांच्या मदतीने पोलिसांवर गोळीबार केला. यामध्ये आठ पोलीस ठार झाले, तर सातजण जखमी झाले. या घटनेनंतर राज्यामध्ये खळबळ उडाली आहे. गोळीबारानंतर विकास दुबे फरार झाला होता. मागील आठ दिवस पोलिसांना हुलकावणी देत तो फिरत होता. हरियाणातील एका हॉटलमध्येही तो थांबला होता. मात्र, पोलीस पोहचण्याच्या आधी त्याने पोबारा केला. त्याच्यावर 5 लाखांचे बक्षिस ठेवण्यात आले होते. त्याच्या तीन साथीदारांना पोलिसांनी चकमकीत ठार केले असून इतरांना पकडण्यात येत आहे.
विकास दुबेला मध्यप्रदेशातील महाकाल मंदिरातून अटक केली आहे. हरियाणातून मध्यप्रदेशात तो कसा गेला याची माहिती अजून उघड झालेली नाही. विकास दुबेवर 60पेक्षा जास्त गुन्हे दाखल असून त्याचे स्थानिक पोलीस आणि राजकारण्यांशी संबध असल्याचेही तपासात उघड होत आहे. प्रियांका गांधी यांनी या गुन्ह्याचा सीबीआय तपास करण्याची मागणी केली आहे.