नवी दिल्ली - लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी आज(शुक्रवार) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेवून लडाख सीमेवरील परिस्थितीची माहिती दिली. लष्करप्रमुख नरवणे दोन दिवस पूर्व लडाखच्या दौऱ्यावर होते. त्यांनी सीमेवरील फॉर्वर्ड पोस्टला(चौकी) भेटी दिल्या तसेच सैन्याच्या तयारीचा आढावा घेतला.
15 जूनला गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसाचारानंतर भारतीय सीमेवर ‘हाय अलर्ट’ आहे. 22 जूनला वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर चिनी सैनिक आणि वाहनांचा ताफा सीमेवरुन काही अंतर मागे सरकला आहे. पुन्हा सीमेवर हिंसाचाराची घटना टाळण्यासाठी लष्कराकडून पाऊले उचलण्यात येत आहेत. 22 जूनला भारतीय लष्कराचे 14 कॉर्पर्स कमांडर हरिंदर सिंग आणि चीनी समकक्ष अधिकारी यांच्यात मोल्डो येथे चर्चा झाली. या बैठकीत सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी सविस्तर चर्चा झाली.