नवी दिल्ली - लष्करप्रमुख बिपीन रावत यांची भारताचे सरसेनाध्यक्ष म्हणजेच 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' (सीडीएस) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय सुरक्षा समितीने मंगळवारी सीडीएस या पदाला मंजूरी देत रावत यांच्या नावाची घोषणा केली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सरसेनाध्यक्ष म्हणजेच त्यांना 'फोर स्टार जनरल'चा मान मिळाला आहे.
सरसेनाध्यक्ष बिपीन रावत यांनी आज (मंगळवारी) राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट दिली. तसेच आज त्यांना लष्कर प्रमुख पदासाठीचा शेवटचा 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला.
लष्करप्रमुख बिपीन रावत हे बुधवारी आपल्या पदावरून निवृत्त होत आहेत. तर रावत यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे हे भारताचे नवे लष्करप्रमुख असतील. सरसेनाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर रावत यांच्यावर तिन्ही सैन्य दलांमध्ये समन्वय राखण्याबरोबरच सीडीएसवर लष्करी विषयांवर सरकारला सल्ला देण्याची जबाबदारी असेल. तसेच लष्कराच्या विविध मोहिमांमध्ये समन्वय राखण्याबरोबरच शस्त्रास्त्र खरेदीमध्ये त्यांची मोठी भूमिका राहणार आहे. तर तिन्ही दल प्रमुखांच्या वेतना इतकाच पगार सीडीएसला दिला जाईल.
हेही वाचा -नागालँडमध्ये सशस्त्र बल विशेष अधिकार कायदा पुढील 6 महिन्यांसाठी लागू