महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

इंग्लंडच्या आर्चबिशपचे लोटांगण, म्हणाले- जालियनवाला हत्याकांडाची  मागतो माफी - जनरल डायर

'त्यांनी काय केले, हे आजही तुमच्या लक्षात आहे. त्यांच्या आठवणी आहेत. येथे जो गुन्हा घडला, त्याविषयी मला लाज वाटते आणि दुःखही होत आहे. धार्मिक नेता म्हणून मी या दुःखद घटनेविषयी शोक व्यक्त करत आहे,' असे आर्चबिशप वेल्बी यांनी म्हटले.

'त्या' गुन्ह्याची लाज वाटते

By

Published : Sep 11, 2019, 1:38 PM IST

अमृतसर -अमृतसरमध्ये स्वातंत्र्याच्या मागणीसाठी जालियनवाला बाग येथे सभेसाठी आलेल्या नि:शस्त्र भारतीयांवर बेछूट गोळीबार करण्यात आला होता. ब्रिटिश सैन्याच्या जनरल डायरने या गोळीबाराचे आदेश दिले होते. या ठिकाणी मोठा रक्तपात झाला होता. तरीही, आजपर्यंत ब्रिटिशांकडून या कृत्याची माफी मागण्यात आलेली नाही. अनेकदा ब्रिटिशांकडून या अमानुष कृत्याबद्दल क्रूरकर्मा जनरल डायरचे कौतुकच करण्यात आले आहे. मात्र, भारताच्या दौऱ्यावर असलेल्या इंग्लडमधील कँटरबरी चर्चच्या आर्चबिशप जस्टीन वेल्बी यांनी जालियनवाला बागेतील स्मृती स्तंभासमोर डोके ठेवत माफी मागितली आहे.

'त्यांनी काय केले, हे आजही तुमच्या लक्षात आहे. त्यांच्या आठवणी आहेत. येथे जो गुन्हा घडला, त्याविषयी मला लाज वाटते आणि दुःखही होत आहे. धार्मिक नेता म्हणून मी या दुःखद घटनेविषयी शोक व्यक्त करत आहे,' असे आर्चबिशप वेल्बी यांनी म्हटले. भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लडमधील कँटरबरी चर्चचे आर्चबिशप रेव्हरंड जस्टीन वेल्बी यांनी जालियनवाला बागेला मंगळवारी भेट दिली. स्मृती स्तंभासमोर नतमस्तक होत वेल्बी यांनी हुतात्म्यांना अभिवादन केले.

१३ एप्रिल १९१९मध्ये बैसाखी सणाच्या दिवशी अमृतसरमधील जालियनवाला बागेत स्वातंत्र्याच्या मागणीसाठी सभा बोलवण्यात आली होती. यावेळी जमलेल्या भारतीयांवर ब्रिटिश सैन्याने अंदाधुंद गोळीबार केला होता. यात लहान मुले, महिला, पुरुष, वृद्धांपर्यंत अनेकजण मारले गेले होते. मात्र, मृतांचे नातेवाईक, या गोळीबारात जखमी झालेल्या आणि कसेबसे वाचलेल्या लोकांची स्थिती भीषण होती. त्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांड स्वातंत्र्य चळवळीचे प्रतीक झाले होते.

हेही वाचा - उत्तरप्रदेशातील 'या' पोलीस ठाण्यात १९ वर्षांत फक्त २ गुन्ह्यांची नोंद

१३ एप्रिल २०१९ ला या हत्याकांडाला १०० वर्षे पूर्ण झाली. या वेळी, जालियनवाला बाग स्मृतिस्थळी हुतात्म्यांना मानवंदना देणारे आणि त्यांच्या स्मृती जागृत करणारे कार्यक्रम झाले होते. याशिवाय, ब्रिटिश संसदेतही ९ एप्रिलला या विषयावर चर्चा झाली होती. तेव्हा माजी पंतप्रधान थेरेसा मे यांनी या हत्याकांडाविषयी अत्यंत पश्चाताप होत असल्याचे म्हटले होते. या वेळी, या घटनेविषयी माफी मागण्याचीही मागणी विरोधक नेते कामगार पक्षाचे जेरेमी कॉर्बाईन यांनी केली होती. 'ब्रिटिश सरकारने पूर्णपणे स्पष्ट आणि निःसंदिग्ध शब्दांत भारतीयांची माफी मागावी,' असे त्यांनी म्हटले होते. मात्र, थेट माफी न मागता थेरेसा मे सरकारने पश्चाताप व्यक्त केला होता.

हेही वाचा - दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर भारताला मिळणार पहिलं राफेल विमान

ABOUT THE AUTHOR

...view details