नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे (आप) नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शहरातील वाढत्या गुन्ह्याविषयी चिंता व्यक्त केली आहे. नागरिकांनी सुरक्षेसाठी कुणाचा दरवाजा ठोठवायचा, असा सवाल करत त्यांनी दिल्ली पोलिसांना चांगलेच फैलावर घेतले.
'दिल्लीमध्ये गुन्हेगारी वेगाने वाढत आहे. वसंत विहारमध्ये वृद्ध जोडप्यांचा त्यांच्या कर्मचाऱ्यांसह हत्या झाली. गेल्या 24 तासात राजधानी दिल्लीत 9 खून झाले आहेत. नागरिकांनी त्यांच्या सुरक्षेसाठी कोणास संर्पक साधावा?', असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या टि्वटला दिल्ली पोलिसांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'दिल्लीमध्ये गुन्हे वाढले नसून गेल्या वर्षीच्या तुलनेत ते 10 टक्क्यांनी कमी झाले आहेत. हे दिल्ली पोलिसांच्या प्रयत्नांचे परिणाम आहे', असे म्हणत दिल्ली पोलिसांनी टि्वटच्या माध्यमातून पलटवार केला आहे.
याचबरोबर आम आदमी पक्षाच्या नेत्या अतीशी मार्लेना यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. 'दिल्लीमध्ये वासेपूरसारखी स्थिती निर्माण झाली आहे. महिलांना रात्री 8 नंतर घरातून बाहेर पडण्याची भिती वाटते', असे त्या म्हणाल्या आहेत. यावेळी त्यांनी द्वारका येथील पती व पत्नीची आणि आता वसंत विहारमधील वयोवृद्ध जोडप्याच्या हत्येचा अहवाल दिला आहे.