नवी दिल्ली– वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्याबद्दल केलेल्या ट्विटबाबत माफी मागण्यास नकार दिला आहे. जर विधान मागे घेतले तर माझ्या विवेकाचा आणि मला सर्वोच्च आदर वाटत असलेल्या संस्थेचा अवमान होईल, असे प्रशांत भूषण यांनी म्हटले आहे. भूषण यांना अवमान केल्याप्रकरणी सू मोटोद्वारे दाखल केलेल्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरविले आहे.
प्रशांत भूषण म्हणाले, की माझे ट्विट हे गुणवत्तेबाबतचा विश्वास व्यक्त करतात. त्यावर मी ठाम आहे. हा विश्वास जाहीरपणे व्यक्त करणे, ही माझी नागरिक म्हणून उच्च अशी जबाबदारी आहे. तसेच न्यायालयाचा कायदेशीर अधिकारी म्हणून जबाबदारी आहे. त्यामुळे असा विश्वास व्यक्त केले असताना अटीवर अथवा विनाअट माफी मागणे हे अप्रामाणिक ठरणार आहे.
पुढे त्यांनी म्हटले की सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण सत्य माहिती विचारात घेतली नाही. विधान हे सत्य होते, असा विश्वास आहे. मी माझा चांगला विश्वास व्यक्त केला आहे. त्यामागे सर्वोच्च न्यायालयाची अथवा कोणत्याही सर्वोच्च न्यायाधीशाची प्रतिमा मलिन करण्याचा उद्देश नसल्याचेही भूषण यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा अवमान प्रकरणात दोषी ठरल्यानंतर न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी भूषण यांना तीन दिवसात विधानावर विचार करून विनाअट माफी मागण्याचे आदेश दिले होते. जर भूषण यांनी माफी मागितली नाही तर सर्वोच्च न्यायालय त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे.
न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायधीशांच्या खंडपीठाने प्रशांत भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी 14 ऑगस्टला दोषी ठरवले होते. न्यायालयाचा अवमान करणाऱ्या व्यक्तीस 6 महिने तुरुंगवास किंवा 2 हजार रुपये दंड दिला जातो. काही प्रकरणात दोन्हीही शिक्षा दिली जाते.