नवी दिल्ली - देशात असे कितीतरी लोकं आहेत ज्यांना स्वत:चे घर नाही, राहायला जागा नाही, खायला अन्न नाही. दररोज कितीतरी निराधार लोकं उपाशी झोपतात. अशा या लोकांच्या मदतीसाठी सन २००० मध्ये डॉ. बीएम भारद्वाज यांनी 'अपना घर'ची स्थापना केली. आज अपना घर या आश्रमाच्या देशभरात ३५ शाखा तर नेपाळमध्ये एक शाखा कार्यरत आहे.
गरजू, निराधार लोकांना मदतीचा हात द्यावा या उद्देशातून त्यांनी अपना घरची सुरुवात केली. आणि पाहता पाहता संपूर्ण जनसेवेतून चालणारे हे आश्रम आज तब्बल ६ हजार ४०० निराधारांचे घर बनले आहे. या आश्रमाला २० वर्ष झाले असून आत्तापर्यंत निराधार, बेघर आजारी असलेल्या जवळपास २२ हजार लोकांवर उपचार करुन त्यांना स्वस्थ करण्यात आले आहे. या आश्रमातून दररोज ४ ते ५ आणि दर महिन्याला जवळपास दीडशे लोकांवर उपचार करुन स्वस्थ झाल्यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवले जाते.
डॉ. भारद्वाज आणि आणि माधुरी भारद्वाज यांच्या अपना घरने आज अनेकांना नवसंजीवनी दिली आहे. त्यांनी लावलेले हे अपना घर नावाचे रोपटे आज मोठे झाले असून पाहता पाहता त्याच्या फांद्या देशभरात पसरल्या. आज या आश्रमाच्या देशभरात ३५ तर नेपाळमध्ये एक शाखा कार्यरत आहे. गरजवंतांच्या या 'अपना घर'मध्ये प्रत्येकाला जागा आहे. माणसंच नव्हे तर, जखमी प्राणी, पशु पक्ष्यांवरदेखील येथे उपचार केले जातात.