नवी दिल्ली - गेल्या काही महिन्यांपासून सीमेवर चीन आणि भारतादरम्यान तणाव आहे. तणाव निवळण्यासाठी सैन्य स्तरावर चर्चा करण्यात येत आहे. मात्र, चीनच्या आडमुठ्या भूमिकेमुळे चर्चेत अडचणी येत आहेत. यातच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 'जो आमच्या वाटेला जाईल त्याला सोडणार नाही', अशा शब्दात चीनला इशारा दिला आहे. तसेच चर्चा सुरू असून अद्याप कोणताही समाधानकारक तोडगा निघाला नसल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी चीनची विस्तारवादी धोरणावर भाष्य केले. चीनचे विस्तारवादी ध्येय आहे. यावर भारताची भूमिका काय, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर राजनाथ सिंह यांनी 'जर एखादा देश विस्तारवादी आहे. तो भारताच्या भूमीवर कब्जा करण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला रोखण्याचे सामर्थ्य भारतामध्ये आहे', असे उत्तर दिले.
परिस्थीती अद्याप 'जैसे थे' -
आम्हाला शांतता हवी आहे. मात्र, जर कोणी आमच्या वाटेला आले. तर त्याला आम्ही सोडणार नाही. भारताचा स्वाभिमान दुखावणारी कोणतीही गोष्ट कदापि खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराच त्यांनी चीनला दिला. तसेच दोन्ही देशादरम्यान चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. मात्र, परिस्थीती अद्याप 'जैसे थे' आहे, असे त्यांनी सांगितले.