महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बालाकोट स्ट्राईकचा पुरावा मागणाऱ्या वीरपत्नीही पाकिस्तानीच, भाजपचे मुख्यमंत्री बरळले

'यावेळच्या निवडणुका भारत आणि पाकिस्तान दरम्यान होत आहेत. कारण, पाकिस्तान हवाई स्ट्राईकचे पुरावे मागत आहे आणि काँग्रेसही हेच पुरावे मागत आहे. दोघांचीही भाषा एकच आहे,' असे रुपानी म्हणाले.

विजय रुपानी

By

Published : Apr 10, 2019, 11:11 AM IST

गांधीनगर - गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी मंगळवारी गांधीनगर येथील पक्ष कार्यालयात केलेल्या भाषणात धक्कादायक विधान केले आहे. 'भारतीय हवाई दलाने बालाकोटवर केलेल्या स्ट्राईकचा पुरावा मागणारे सर्वजण देशविरोधी आणि पाकिस्तानचे समर्थक आहेत. पुलवामा बॉम्ब हल्ल्यातील हुतात्म्यांच्या पत्नींनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जरी बालाकोट स्ट्राईकचा पुरावा मागितला, तर तेही पाकिस्तानीच आहेत,' असे धक्कादायक वक्तव्य विजय रुपानी यांनी केले आहे.

'मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, यावेळच्या निवडणुका भारत आणि पाकिस्तान दरम्यान होत आहेत. का? कारण, पाकिस्तान हवाई स्ट्राईकचे पुरावे मागत आहे आणि काँग्रेसही हेच पुरावे मागत आहे. दोघांचीही भाषा एकच आहे,' असे रुपानी म्हणाले. 'तेव्हा आता जे कोणी सेनेच्या कारवाईवर संशय घेईल, ते सर्व पाकिस्तानलाच मदत करत आहेत.' रुपानी यांना पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांच्या कुटुंबीयांनी स्ट्राईकचे पुरावे मागितले, तर त्यांनाही असेच म्हटले जाईल का, असे पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी ताबडतोब होकार दिला. 'हो नक्कीच. आपल्या सेनेवर संशय घेणारा निश्चितच पाकिस्तानी आहे,' असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री रुपानी यांनी भाजपचा निवडणूक जाहीरनामा 'संकल्प पत्रा'च्या गुजराती भाषांतराचे उद्घाटन करताना केलेल्या भाषणात हे वक्तव्य केले आहे. 'संकल्प पत्र ही नवीन भारत निर्माण करण्याची प्रतिज्ञा आहे. भारताने मागील पाच वर्षांत जगात चांगली ओळख निर्माण करण्याइतकी उंची गाठली आहे. मोदी सरकारने मागच्या ५ वर्षांत भ्रष्टाचाराविरोधात मोठा लढा दिला आहे,' असे रुपानी यांनी म्हटले आहे.

'देशाची सुरक्षा सर्वांत महत्त्वाची आहे. आमच्या सरकारने घुसखोरांना मागे हटवण्यासाठी सुरक्षा दलांना निर्णय घेण्याची आणि कारवाई करण्याची पूर्ण मोकळीक दिली. दहशतवादाविरोधी कारवाईत आमचे सरकार कधीही तडजोड करणार नाही,' असे ते म्हणाले. 'आम्ही आर्टिकल ३७० आणि आर्टिकल ३५ए रद्द करू. तसेच, राम मंदिरही बांधू,' असेही रुपानी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details