महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 25, 2019, 1:49 PM IST

ETV Bharat / bharat

पीएनबी घोटाळा : मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा, अॅन्टिग्वाचे नागरिकत्व होणार रद्द

अॅन्टिग्वाचे पंतप्रधान गॅस्टन ब्रॉउन म्हणाले, दुसऱ्या देशातून पळून आलेल्या व्यक्तीला आम्ही नागरिकत्व देऊ शकत नाही. त्यामुळे चोक्सीचे नागरिकत्व रद्द करुन त्याला भारतात माघारी पाठवले जाईल.

मेहुल चोक्सी

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मेहुल चोक्सीने अॅन्टिग्वाचे नागरिकत्व घेतले आहे. परंतु, भारताने दबाव टाकल्यानंतर अॅन्टिग्वाचे पंतप्रधान गॅस्टन ब्रॉउन यांनी मेहुल चोक्सीचे नागरिकत्व रद्द करणार असल्याचे सांगितले आहे.

अॅन्टिग्वाचे पंतप्रधान गॅस्टन ब्रॉउन म्हणाले, दुसऱ्या देशातून पळून आलेल्या व्यक्तीला आम्ही नागरिकत्व देऊ शकत नाही. त्यामुळे चोक्सीचे नागरिकत्व रद्द करुन त्याला भारतात माघारी पाठवले जाईल.

फरार उद्योगपती मेहुल चोक्सी हा पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेल्या नीरव मोदीचा मामा आहे. तोही या प्रकरणात प्रमुख आरोपी आहे. हे दोघेही सध्या तपास यंत्रणांना चकवा देत परदेशात राहात आहेत. गेल्या वर्षी उघडकीस आलेल्या या घोटाळ्यात १३ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला होता. या दोघांनी बँकेला फसवून कर्ज न फेडताच देशातून पळ काढला आहे. या घोटाळ्यात बँकेच्या काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

काही दिवसांपूर्वीच चोक्सीने 'मी भारतातून पळालो नाही. उपचारांसाठी परदेशात गेलो आहे,' असे न्यायालयाला कळवले होते. यानंतर 'चोक्सीला कॅरेबिअन देश अँटिग्वा येथून भारतात आणण्यासाठी एअर अँब्युलन्स पाठवण्यासही तयार आहोत, यामध्ये वैद्यकीय तज्ज्ञ मंडळी असतील. त्याचबरोबर चोक्सीला भारतात सर्व प्रकारच्या आवश्यक वैद्यकीय सुविधा देखील पुरवण्यात येतील,' असा युक्तिवाद ईडीने न्यायालयात केला आहे.

'मेहुल चोक्सीने तपासामध्ये कधीही सहकार्य केलेले नाही. त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे. इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही काढली आहे. मात्र, तरीही तो परत येण्यास तयार नाही. त्यामुळेच त्याला फरार घोषित करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details