पणजी- उत्तर गोव्यातील सत्तरी तालुक्यातील अणसूले गाव गोवा मुक्तीपासून आजही बारमाही रस्त्यापासून वंचित आहे. रस्ता होत नाही, तोपर्यंत मतदान नाही, अशी ग्रामस्थांनी भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांना समजविण्यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी आज गावाला भेट दिली. परंतु, रस्ता होईपर्यंत आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.
सत्तरी तालुक्यातील पर्ये मतदारसंघातील हे गाव नव्याने विकसित होणाऱ्या वाळपई शहराच्या हद्दीपासून हाकेच्या अंतरावर आहे. परंतु, बारमाही वाहतूक सुविधा नसल्याने वृद्ध, महिला, मुले यांना ते फारच त्रासदायक ठरते. गोवा सरकारने मुलांची शाळेत ने-आण करण्यासाठी सुरू केलेला 'बालरथ' गावात येत नाही. त्यामुळे मुलांची पायपीट आजही कायम आहे. त्यामुळे गावापर्यंत रस्ता होत नाही, तोपर्यंत मतदान करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घोषित केला होता. त्याची दखल घेत उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका यांनी आज अतिरिक्त जिल्हाधिकारी गोपाळ पार्सेकर आणि मामलेदार यांच्यासह अणसूले ग्रामस्थांची भेट घेत त्यांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. तसेच गावची रस्त्याची समस्या आचारसंहिता संपताच सोडविली जाईल, असेही आश्वासन दिले. मात्र, ग्रामस्थ रस्ता होत नाही तोपर्यंत मतदान न करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.