नवी दिल्ली - निर्भया प्रकराणातील आरोपी असलेल्या मुकेशची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळल्याच्या विरोधात मुकेशने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यासोबतच, दुसरा एक आरोपी अक्षयने काल (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केल्याची माहिती तिहार तुरूंग प्रशासनाने दिली आहे.
राष्ट्रपती कोविंद यांनी आरोपी मुकेशची दया याचिका फेटाळली होती. त्याविरोधात मुकेशने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर निर्णय देत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, की राष्ट्रपतींनी सर्व कागदपत्रे पाहूनच याबाबत निर्णय घेतला होता. त्यामुळे, त्याबाबत पुनर्विचार होणार नाही. या प्रकरणातील आरोपी मुकेश कुमार सिंह, पवन कुमार गुप्ता, विनय कुमार शर्मा, अक्षय कुमार सिंह या चौघांना १ फेब्रुवारीला फाशी होणार आहे. वारंवार दाखल होत असलेल्या याचिका पाहून निर्भयाच्या आईने नाराजी दर्शवली होती. मानवाधिकार संघटना या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.