नवी दिल्ली - कोरोना पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये कर्तव्य बजावत असलेल्या दिल्ली पोलिसांमध्येही कोरोनाची लागण झाली आहे. दिल्लीच्या रोहिणी येथील एक पोलीस हेड कॉन्स्टेबल हे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना दिल्लीच्या एलएनजेपी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसाला कोरोनाची लागण झाल्याचीही दुसरी घटना असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कोरोनाची लागण झालेले ४४ वर्षीय हेड कॉन्सटेबल हे त्यांच्या कुटुंबासोबत रोहिणी येथे राहतात. सध्या ते दिल्लीच्या इंदिरा गांधी अंतरराष्ट्रीय विमानतळावरील टी - ३ मध्ये एफआरआरओ ब्रँचमध्ये आहेत. त्यांच्या कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर आंबेडकर रुग्णालयात चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना विशेष रुग्णवाहिका आणि पॅरामेडिकल स्टाफद्वारे एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, आता त्यांच्या कुटुंबातील ३९ वर्षीय पत्नी, १८ वर्षीय मुलगा आणि १३ वर्षीय मुलीला डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात नेण्यात आले आहे.