नवी दिल्ली- दिल्ली पलिसांमधील एका सहाय्यक पोलीस आयुक्ताला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे त्यांची पोस्टींग राष्ट्रपती भवनामध्ये झाली होती. कोरोनाचे निदान झाल्यानंतर त्यांना दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या सहा व्यक्तींना खबरदारी म्हणून होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच, त्यांचे स्वॅब नमुनेही तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. राष्ट्रपती भवनमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळपर्यंत ते राष्ट्रपती भवनात हजर होते.
त्यानंतर, शनिवारी त्यांची तब्येत ठीक नसल्याचे लक्षात येताच त्यांचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आले. आज त्याचा अहवाल आल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या सहकाऱ्यांचे तपासणी अहवाल अजून येणे बाकी आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती भवनाच्या आवारात असलेल्या स्टाफ क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्याच्या संपूर्ण कुटुंबीयांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते.
हेही वाचा :गडचिरोली पोलिसांवर नक्षलवाद्यांचा हल्ला, पीएसआयसह एक पोलीस जवान हुतात्मा..