नवी दिल्ली -सैन्यदलातील एक सैनिक आपल्या पत्नीला मिळवण्यासाठी पोलीस ठाण्यात खेटे घालत आहे. गाजियाबादमधील सिहानी गेट परिसरातील एक सैनिक आणि पोलीस दलात कार्यरत असलेली त्याची पत्नी गेल्या काही दिवसांपासून वेगळे राहात आहेत. या लग्नामुळे तिच्या माहेरचे लोक खुश नाहीत, त्यामुळे तिला ते सासरी येऊ देत नाहीत, असा आरोप या सैनिकाने केला आहे. आपल्याला आपली पत्नी परत मिळावी, अशी मागणी या सैनिकाने पोलिसांकडे केली आहे.
या दोघांचे 9 वर्षांपूर्वीलग्न झाले आहे. पत्नी बुलंदशहरची आहे असून सध्या तिची पोस्टिंग गाजियाबादला आहे. तर, सैनिक पती हरियाणाचा आहे. पत्नीच्या माहेरचे या लग्नामुळे समाधानी नाहीत. त्यामुळे ते आपल्या पत्नीला आपल्या विरोधात फूस लावत आहेत. मला माझी दोन मुले व पत्नी परत मिळवून द्यावीत, अशी विनंती या सैनिकाने पोलिसांना केली आहे. मात्र, पोलीस असलेल्या पत्नीनेही पतीवर काही आरोप केले आहेत.