अमरावती- केरळमध्ये हत्तीणीने फळामध्ये भरलेले स्फोटक चावल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आंध्र प्रदेशात गावठी बॉम्ब(क्रूड बॉम्ब) चावल्याने एक गाय जखमी झाली आहे. जंगली प्राण्यांना शेतापासून दुर ठेवण्यासाठी हा बॉम्ब ठेवण्यात आला होता. मात्र, गाईने स्फोटकाचा चावा घेतला.
पंजानी येथील पोलीस उपनिरिक्षक लोकेश रेड्डी यांनी सांगितल्यानुसार, 'रविवारी साडेचारच्या दरम्यान तीन गायांना गोशाळेतून शेजारच्या जंगलात चरण्यासाठी सोडण्यात आले होते. त्यातील एका गाईने जंगली प्राण्यांना शेतापासून दुर ठेवण्यासाठीचा क्रूड बॉम्ब चावला. त्यामुळे गाईच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली'.
गाईला तत्काळ वैद्यकीय मदत पुरविण्यात आली. नंतर पुढील उपचारासाठी तिरुपती येथे नेण्यात आले आहे, असे रेड्डी म्हणाले. या प्रकरणी गोशाळेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे रेड्डी यांनी सांगितले.
केरळमध्ये झाला होता हत्तीणीचा मृत्यू
27 मे ला केळमधील पल्लकड जिल्ह्यामध्ये स्फोटके भरलेले फळ खाल्ल्याने एक गर्भवती हत्तीण गंभीर जखमी झाली होती. जबडा तुटल्याने तिला काहीही खातापिता येत नव्हते. दोन आठवड्यानंतर वेलियार नदीत थांबली असताना या हत्तीणाचा मृत्यू झाला. या घटनेचे प्रतिसाद देशभर उमटले. केरळ सरकारवरही टीका झाली. दोषींना कडक शिक्षा देण्याची मागणी प्राणी हक्क संघटनांनी केली होती.