अमरावती (आंध्र प्रदेश) - मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी तीन राजधान्या निश्चित करण्याचे ठरवले आहे. मात्र, त्यांच्या या निर्णयाला आंध्र प्रदेशच्या जनतेचा पाठिंबा नसल्याची टीका तेलुगु देसम पार्टीचे(टीडीपी) राष्ट्रीय अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. राजधानी संदर्भात नव्याने ठराव घेतल्यास जनमत फिरेल की काय, अशी भीती जगनमोहन यांना वाटत आहे, असेही चंद्राबाबू म्हणाले.
विधानसभा बरखास्त करून पुन्हा निवडणुका घ्याव्यात, अशी टीडीपीची मागणी आहे. मात्र, सत्ताधारी पक्ष टीडीपीचे आव्हान स्वीकारण्यास तयार नाही. अमरावतीत राजधानी स्थापन करण्यासाठी १३ हजार गाव आणि ३ हजार महापालिका प्रभागातील नागरिकांनी आपापल्या प्रदेशातून माती आणि पाणीही आणले आहे, असा दावा चंद्राबाबू यांनी केला आहे.