तिरुपती (आंध्र प्रदेश) - भगवान वेंकटेश्वरांच्या भक्तांनी दान केलेल्या 50 स्थावर 'अचल' मालमत्तांच्या लिलावाला आंध्र प्रदेश सरकारने कडाडून विरोध दर्शवला. सरकारने ही लिलाव प्रक्रिया सोमवारी स्थगित केली. तसेच, मंदिर प्रशासनाला आपल्या निर्णयाचे पुन्हा परीक्षण करण्यास सांगितले.
सरकारने व्यंकटेश्वरांच्या मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानमला (TTD) मंदिराच्या मालमत्तेचा लिलाव करण्याविषयी पुन्हा नवा निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. या मालमत्ता तामिळनाडू, आंध्र प्रदेश, हृषिकेश आणि उत्तराखंडमध्ये आहेत. या लिलावाविषयी भाविक आणि धार्मिक पुरोहितांशी चर्चा केल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतल्याचे मंदिर समितीतील एका अधिकाऱ्याने सांगितले.
भाविकांव्यतिरिक्त भाजप, जनसेना पक्ष, सीपीआय-एम, टीडीपी आणि काँग्रेसने व्यवस्थापनाने घेतलेल्या लिलावाच्या निर्णयाला विरोध केला होता. या निर्णयामुळे भगवान व्यंकटेश्वरांच्या प्राचीन देवस्थानाला स्वतःच्या मालमत्ता दान करणाऱ्या भाविकांच्या भावना दुखावल्या जातील, असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे लिलावाची फेरतपासणी करावी, असे सरकारने म्हटले आहे.