चेन्नई - आजकाल प्लास्टिक म्हटलं की प्रदूषण हेच समीकरण डोळ्यासमोर येतं. मात्र याच प्लास्टिकचा योग्य वापर केल्यास, त्यापासून आपण कितीतरी गोष्टी मिळवू शकतो.
नो टू सिंगल यूज प्लास्टिक : प्लास्टिकपासून खनिज तेलाची निर्मिती! हाच विचार करून, आंध्र प्रदेशच्या विजयवाडामधील के. बी. एन. महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांनी प्लास्टिक कचऱ्यापासून खनिजतेल बनवण्यास सुरूवात केली आहे. या तेलाचा वापर औद्योगिक उत्पादनांसाठी केला जाऊ शकतो. एमएस्सी करणाऱ्या या विद्यार्थ्यांनी, पीव्हीसी प्लास्टिक कचऱ्यापासून खनिजतेल बनवण्याच्या प्रक्रियेचा शोध लावला आहे. त्यांच्यामते, २ किलो प्लास्टिक कचऱ्यापासून १०० ग्रॅम तेलाची निर्मिती ते करू शकतात.
या प्रकप्लावर काम करणारा विद्यार्थी शिवाने सांगितले, की प्लास्टिकपासून खनिजतेलाची निर्मीती दोन प्रकारे केली जाऊ शकते, ती म्हणजे लहान स्तरावर आणि औद्योगिक स्तरावर. जेव्हा आपण पॉलिव्हिनिल क्लोराईडला उष्णता देतो, तेव्हा त्याच्या वाफांमधून आपल्याला खनिजतेल मिळू शकते. त्यानंतर त्या खनिजतेलावर पायरॉलिसिस प्रक्रिया करून आपण पेट्रोल मिळवू शकतो.
तर, केबीएन महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. कृष्णवेणी सांगतात, प्लास्टिकपासून खनिजतेलाची निर्मिती करण्याचा आमचा प्रकल्प होता. यामध्ये आम्ही पॉलीव्हिनिल क्लोराईड प्लास्टिकचा वापर केला. २०० ते ४०० डिग्री सेंटीग्रेड पर्यंत पायरोलिसिस प्रक्रियेचा वापर करून आम्ही खनिजतेल मिळवले. या खनिजतेलावर प्रक्रिया करून पेट्रोल किंवा डिझेल तयार करता येऊ शकते. या प्रक्रियेद्वारे तयार केलेले पेट्रोल हे ३० ते ४० रूपये प्रतिलीटर किंमतीला विकता येते. आम्ही यासाठी विविध प्रकारच्या प्लास्टिकचा वापर केला. मात्र, पीव्हीसी पाईप्समधील प्लास्टिकपासून सर्वोत्तम दर्जाचे खनिजतेल मिळाले आहे.
आपण पाहतोच, की दररोज कित्येक टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो आहे.. यामध्येही कित्येक प्रमाणात सिंगल यूज प्लास्टिकचा समावेश आहे. या प्लास्टिकचा असाच अभिनव पद्धतीने वापर केल्यास, लवकरच आपला देश प्लास्टिकमुक्त होईल हे नक्की!
हेही वाचा : नो टू सिंगल यूज प्लास्टिक : धार्मिक शहर तिरूपती आता आहे प्लास्टिमुक्त!