नवी दिल्ली - कोरोना लॉकडाऊनमुळे सर्व वाहतूक सुविधा बंद आहेत. यामुळे अनेक ठिकाणी लाखो प्रवासी अडकून पडले आहेत. दिल्लीतील निजामुद्दीन दरगाह परिसरातही बिहारमधील एक वृद्ध अडकून पडला आहे. अब्दुल रझ्झाक असे या वृद्धाचे नाव आहे. त्यांच्या कुटुंबाला अब्दुल यांच्या या दिल्ली भेटी बाबत काहीही कल्पना नाही. विशेष म्हणजे त्यांना त्यांच्या कुटुंबातील कुणाचाही फोन नंबर माहित नाही.
निजामुद्दीन दर्गामध्ये दर्शनासाठी आलेली वृद्ध व्यक्ती अडकली दिल्लीत; कुटुंबाला नाही कल्पना - कोरोना लॉकडाऊन
दिल्लीतील निजामुद्दीन दरगाह परिसरात बिहारमधील एक वृद्ध अडकून पडला आहे. अब्दुल रझ्झाक असे या वृद्धाचे नाव आहे. त्यांच्या कुटुंबाला अब्दुल यांच्या या दिल्ली भेटी बाबत काहीही कल्पना नाही.
अब्दुल रझ्झाक हे बिहारच्या सीतामर्ढी जिल्ह्यातील अरिया मुजरोह भागात राहतात. तेथे त्यांची पत्नी आणि तीन मुले असे कुटुंब आहे. तर दिल्लीतील तीस हजारी भागात त्यांचा एक मुलगा पेट्रोलपंपावर काम करत असून मुलगी घरकाम करते. मुलांच्या इतक्या जवळ असूनही त्यांना फोन नंबर माहित नसल्याने मुलांना भेटता आले नाही. सध्या ते निजामुद्दीन येथे प्रवाशांसाठी उभारलेल्या केंद्रात राहत आहेत.
अब्दुल रझ्झाक यांच्याकडे स्वत:चे आधार कार्ड असून त्यावर दोन फोन नंबर आहेत. त्यातील एकावर संपर्क होत नसून दुसरा वाचण्यायोग्य नाही. निजामुद्दीन औलियाचे भक्त असलेल्या अब्दुल रझ्झाक यांना त्यांच्या भक्तीची किंमत मोजावी लागत असल्याचे दिसत आहे. आता हा लॉकडाऊन संपण्याची वाट बघण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा काहीही पर्याय नाही.