बिजनोर (यू.पी)- देशात सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे, सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी लग्न संमारंभांना प्रशासनाकडून परवानगी नकारण्यात येत आहे. त्यामुळे, मोजक्या नातेवाईकांसह विवाह इच्छुक युवक-यवती घरात लग्न करताना दिसून येत आहे. मात्र, बिजनोरमधील एका युवकाने चक्क उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर आपला विवाह संपन्न केला आहे.
अरविंद कुमार (वय.२८) असे नवरदेव मुलाचे नाव असून त्यानी उत्तराखंड येथील छाया राणी (वय.२५) हिच्याशी लग्न केले आहे. अरविंद हा उत्तर प्रदेशमधील बिजनोर जिल्ह्यातील रेड झोन असलेल्या रेहर भागात वास्तव्यास आहे, तर छाया ही उत्तराखंडमधील ग्रीन झोन असलेल्या उधम सिंह नगरच्या जसपूर भागात वास्तव्यास आहे. शनिवारी अरविंद हा छाया हिच्याशी लग्न करण्यासाठी रेहरवरून जसपूरच्या दिशेने निघाला होता. यासाठी अरविंदने जिल्हा प्रशासनाकडून पास देखील मिळवली होती. मात्र, वाटेत बिजनोर सिमेवर पोलिसांनी त्याला अडवले. कोरोनामुळे राज्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहे, तसेच रेड झोनमधील व्यक्ती ही ग्रीनझोनमध्ये प्रवेश करू शकत नाही, असे पोलिसांनी अरविंदला सांगितले. अरिवंद ने तडकाफडकी वधू छायाच्या घरच्यांना फोन लावला आणि त्यांना परिस्थितीबाबत सांगितले. यावर वर-वधूच्या घरच्यांनी चर्चा करून अजबच तोडगा काढला. छायाने आपले कुटुंब व पुजाऱ्यासह आणि अरविंदनेही आपले कुटुंब व पुजाऱ्यासह उत्तराखंड सीमेवरील धर्मापूर पोलीस चौकी गाठली व तेथे लग्न केले.