नवी दिल्ली- काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. कोलकाता न्यायालयाने हे अटक वॉरंट काढले आहे. थरुर यांनी गतवर्षी लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान 'हिंदू पाकिस्तान' असा उल्लेख केला होता. थरुर यांच्या या वक्तव्याविरोधात वकील सुमीत चौधरी यांनी याचिका दाखल केली होती.
काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्याविरोधात अटक वॉरंट
भाजपने 2019 ची लोकसभा निवडणूक जिंकली तर 'हिंदू पाकिस्तान' निर्माण होईल, असे वक्तव्य तिरुअनंतपुरम येथे बोलताना थरुर यांनी केले होते.
भाजप स्वत:चे संविधान आणत आहे. ज्यात अल्पसंख्याकांचे समानतेचे अधिकार संपलेले असतील. भाजपने 2019 ची लोकसभा निवडणूक जिंकली तर 'हिंदू पाकिस्तान' निर्माण होईल, असे वक्तव्य तिरुअनंतपुरम येथे बोलताना थरुर यांनी केले होते. भाजपचे संविधान हिंदू राष्ट्र सिद्धांतावर आधारित असेल. महात्मा गांधी, पंडित नेहरु, पटेल यांनी अशा राष्ट्रासाठी लढा दिला नव्हता, असेही ते म्हणाले होते.
थरुर यांच्या या वक्तव्यानंतर भाजपने थरुर आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. थरुर यांच्या वक्तव्यावर राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी भाजपकडून होत होती. दरम्यान, चौधरी यांच्या याचिकेवर सुनावणी करताना कोलकातामधील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने हे अटक वॉरंट जारी केले आहे.