चेन्नई - तामिळनाडूमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १९ जून ते ३० जून, असे १२ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना संक्रमित असलेल्या चार जिल्ह्यातील गरजूंना ३० जूनपर्यंत अम्मा कँटीनद्वारे मोफत जेवणाचे वाटप करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी जाहीर केले आहे. याआधीदेखील अम्मा कँटीनमार्फत गरजूंना जेवणाचे वाटप करण्यात आले होते.
तामिळनाडूमधील चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपुरम आणि चेंगलपेट या चार जिल्ह्यात कोरोना विषाणूने मोठे थैमान घातले आहे. या जिल्ह्यामंध्ये ५० हजाराहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात १९ जून ते ३० जूनपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या १२ दिवसीय लॉकडाऊनदरम्यान फक्त दूध आणि आरोग्य सेवेशी निगडीत सुविधांमध्ये सुट देण्यात आली आहे.