कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये नव्या वर्षात विधानसभा निवडणुकीचा बार उडणार आहे. मात्र, आतापासूनच राजकीय हादरे जाणवू लागले आहेत. तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवसासाठी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आले आहेत.
तृणमूल काँग्रेसचा ग्रामीण चेहरा मानले जाणारे सुवेंदू अधिकारी यांनी प्रथम कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तर 16 डिसेंबरला त्यांनी आमदारिकीचा राजीनामा दिला. त्यानंतर लागलीच त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मात्र, त्याचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारला नसून त्यांना 21 डिसेंबरला हजर राहण्यास सांगितले आहे. राजीनाम्यात तारीख स्पष्ट न केल्यामुळे तो स्वीकारला नसल्याचे अध्यक्षांनी सांगितले. सुवेंदू यांच्या राजीनाम्यानंतर इतर आमदारांनीही राजीनामा देण्यास सुरवात केली आहे. आमदार शीलभद्रा दत्त आणि बन्सारी मैत्य यांनी तृणमूल काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.
अधिकारी कुटुंबाचा राजकीय दबदबा -
सुवेंदू अधिकारी हे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार शिशिर अधिकारी यांचे थोरले पुत्र आहेत. सुवेंदू अधिकारी यांचे वडिल आणि भाऊ दोघेही खासदार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या निकालावरून तृणमूल काँग्रेसने पश्चिम मिदनापूर आणि झारग्राम या दोन जिल्ह्यांमध्ये यापूर्वी आपली पकड गमावली आहे. अधिकारी यांनी पक्ष सोडल्याने पूर्व मिदनापूरमध्ये पक्षाची स्थितीही खालावू शकते. सुवेंदू अधिकारीचा भाऊ दिव्येंदू अधिकारी पूर्व मिदनापूरमधील तामलूक लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.