कोलकाता - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे. पी नड्डा एक दिवसाच्या बंगाल दौऱ्यावर गेले आहेत. शाह यांनी 'राजरहाट न्यूटाऊन एक्शन एरिया तीन' येथे नव्या राष्ट्रीय सुरक्षा गार्ड(एनएसजी) कॅम्पचे उद्धाटन केले. सीएए समर्थनार्थ सभेला संबोधीत करताना त्यांनी सीएएचे समर्थन केले. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचाच विजय होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
'बंगालमध्ये भाजपचेच सरकार सत्तेत येणार' येत्या बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचाच विजय होणार आहे. २०१४ मध्ये भाजपला ८७ लाख मते मिळाली होती. तर २०१९ लोकसभा निवडणुकीमध्ये २.३ कोटी मते मिळाली होती. येत्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून बहूमताने आम्हीच सरकार स्थापन करू, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला.
प्रचार सभेदरम्यान भाजपच्या 40 कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. तसेच आम्हाला सभा घेण्यास नकार देण्यात आला. मात्र, ते आम्हाला थांबवू शकले नाही, अशी टीका शाह यांनी ममता बँनर्जींवर केली. 'सीएए कायदा हा बंगालमधील शरणार्थींना नागरिकत्व देण्यासाठी मोदींनी आणला आहे. मात्र, ममता बॅनर्जी त्याचा विरोध करत आहेत. त्यांनी सीएएच्याविरोधात दंगली घडवल्या आहेत. रेल्वे, रेल्वे स्थानके पेटवली आहेत. त्यांनी सीएएचा कितीही विरोध केला तरी, गेल्या 70 वर्षांपासून येथे राहत असलेल्या शरणार्थींना आम्ही नागरिकत्व देणारच', असे शाह म्हणाले.
अमित शाह यांनी ममता बँनर्जींच्या 'दीदी के बोलो' अभियानावरही टीका केली. तसेच आज भाजपकडून 'आर नोय अन्याय' हे अभियान सुरु करण्यात आले आहे. 'बंगालमधील नागरिक आता अत्याचार सहन करणार नाहीत. या अभियानाअंतर्गत एका-एका बंगालीला भाजपसोबत जोडण्यात येणार असल्याचे शाह यांनी सांगितले. यावेळी भाजपचा टोल फ्री क्रमांक ९७२७२९४२९४ जारी करण्यात आला आहे. या टोल फ्री क्रमांकावर फोन करुन तुमचा पाठिंबा नोंदवा, असे आवाहन शाह यांनी जनतेला केले.
सायंकाळी शाह प्रदेश भाजपबरोबर बैठक घेणार आहेत. या बैठकीत भाजपच्या सर्व खासदार आणि आमदारांना बोलविण्यात आले आहे. बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकींच्या तयारीवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली आहे.